चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुक ही महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात पार पडणार आहे. निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील मतदान प्रक्रिया 19 एप्रिल रोजी पार पडणार आहे. पहिल्यातील टप्प्यातील उमदेवारांनी अर्ज दाखल करण्याची आणि माघार घेण्याची प्रक्रिया देखील पार पडली आहे. त्यानंतर आता निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या एका महिला उमेदवाराने दिलेल्या आश्वासनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्र सुरु झाली आहे.
खरं तर निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार वेगेवेगळी आश्वासने देत असतात. त्यामध्ये मोफतच्या गोष्टींपासून फिरायला जाण्यापर्यंतच्या ऑफर असतात. अखिल भारतीय मानवता पक्षाकडून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये मैदानात असलेल्या वनिता जितेंद्र राऊत या महिला उमेदवाराने खासदार म्हणून निवडून आल्यावर ‘गाव तिथे बियर बार’ सुरू करून बेरोजगारांना बिअर बारचे परवाने वितरीत करण्याचे आश्वासन दिले आहे.
विशेष म्हणजे या महिला उमेदवाराने आपल्या खासदार निधीतून दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये व्हिस्की आणि बिअर देण्याची घोषणा देखील केली आहे. वनिता राऊत या चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार आहेत.चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
वनिता राऊत या सिंदेवाही तालुक्यातील पेंढरी गावातील रहिवासी आहेत. राऊत यांनी यापूर्वी नागपूरमधून 2019 ची लोकसभा आणि विधानसभेला चिमूर विधानसभा निवडणुक लढवली होती. या दोन्ही निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. त्यावेळी चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होती. राऊत यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी उठवून दारूचे दुकाने पुन्हा सुरु करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आता त्यांनी दिलेल्या आश्वसानानंतर वनिता राऊत या संपूर्ण राज्यभर चर्चेत आल्या आहेत.