चंद्रपूर : कोरपना येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने सर्वत्र राजकीय पडसाद उमटले आहे. उन्हाळ्यात शिकवणी वर्ग घेण्याच्या बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपी अमोल लोडेला अकोल्यातून अटक करण्यात आली. अशातच याप्रकरणातील मोठी अपडेट समोर येत आहे. संबंधित शाळेच्या संचालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाळेचे संचालक हे आरोपी अमोल लोडेचे चुलत काका आहेत. ते शाळेच्या संचालक मंडळात देखील ते सहभागी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी आता पॉक्सो कायद्याच्या (POCSO) कलम 21 अंतर्गत शाळेच्या संचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला अकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. आरोपी हा युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षक असलेल्या आरोपीने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसून येत आहेत. या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा केली जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.