अमरावती : ज्येष्ठ समाजसेविका दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या कुटुंबाशी संबंधित एका प्रकरणामुळे अमरावती जिल्ह्यात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या मुलगाअरुण सपकाळ यांच्याविरोधात एका अल्पवयीन मुलीच्या कथित लैंगिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास चिखलदरा पोलीस करत असून, आरोपांची सत्यता अद्याप तपासातून स्पष्ट व्हायची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबाई फुले महिला स्वयंसिद्धा संस्थेशी संबंधित एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5:30 वाजण्याच्या सुमारास कथित घटना घडल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला.
या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 78, 79 आणि 351(2), तसेच POCSO कायद्यातील कलम 6 आणि 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. या कलमांनुसार प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून तपास केला जात आहे.

पोलिसांनी संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी बोलावले असून, कथित घटनेशी संबंधित माहिती आणि पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. तक्रारीतील आरोप, उपलब्ध पुरावे आणि संबंधित व्यक्तींच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार आहे.
सिंधुताई सपकाळ यांनी अनाथ आणि वंचित मुलांच्या संगोपनासाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना देशभरात ओळख मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या संस्थेशी संबंधित या प्रकरणाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.







