Gram Panchayat Election: बुलढाणा: जिल्ह्यातील सर्व 48 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून हे निकाल संमिश्र स्वरूपाचे आहेत. 23 ग्रामपंचायती, महाविकास आघाडीला 14 ग्रामपंचायत तर स्थानिक आघाड्यांना 11 ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. तसेच भाजप आमदार डॉ.संजय कुटेंना मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेली व भाजपकडे असलेली जामोद ग्रामपंचायत आता काँग्रेस पक्षाच्या ताब्यात गेली आहे.
जिल्ह्यात सर्वात चर्चेची ग्रामपंचायतची निवडणूक होती ती म्हणजे जळगाव जामोद तालुक्यातील जामोद ग्रामपंचायतची. ही ग्रामपंचायत याआधी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होती. मात्र, या ठिकाणी मोठा उलटफेर झाला असून 17 पैकी 15 जागा जिंकत काँग्रेसने या ग्रामपंचायतीवर ताबा मिळवला आहे. या ग्रामपंचायतची निवडणूक आमदार संजय कुटे यांनी मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. तसेच जळगाव जामोद तालुक्यात एकूण तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. यामधील दोन ग्रामपंचायत या काँग्रेसने जिंकल्या, तर एक ग्रामपंचायती स्थानिक आघाडीने जिंकली आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचाही दबदबा राहिला आहे. बुलढाणा आणि मेहकर तालुक्यात शिंदे गटाने अनेक ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे तर जिल्ह्यात काँग्रेसनेही मोठी आघाडी घेतली आहे.