नागपूर : नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडल्याचे समोर आले आहे. नदीपात्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. सुट्टी असल्यामुळे हे दोघेही पोहायचा आनंद घ्यायला नदीवर गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे एक मित्र पाण्यात बुडायला लागला, त्यामुळे दुसरा मित्र त्याला वाचवायला पुढे गेला असता दुसरा मित्र सुद्धा पाण्यात बुडला.
ही घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे. महादूला येथे पोहण्याच्या मोहात दोन शाळकरी मुलांनी जीव गमावला आहे. वृषभ राजेंद्र गाडगे आणि रोहन सुभाष साऊसाखडे अशी मृत मुलांची नावे आहेत. हे दोघेही इयत्ता ८ व्या वर्गात शिकत असल्याची माहिती मिळत आहे. काल सकाळी अकरा वाजता ही घटना घडलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काल ७ सप्टेंबर रोजी गणेशोत्सवाची सुट्टी असल्यामुळे गौरी विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी हे दोघेही महिलांसोबत नदीवर गेले होते. नदीकाठी खेळत असताना पाणी बघून या दोघांनाही पाण्यात उतरण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली, परंतु पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे एक मित्र खोल पाण्यात बुडायला लागला. दुसरा मित्र त्याला वाचवण्यासाठी पुढे गेला असता, तोही पाण्यात बुडाला.
शोधमोहिमेनंतर सापडले मृतदेह..
काल सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. परंतु, काल उशिरापर्यंत शोध मोहिम सुरू होती, तरी यांचे मृतदेह सापडले नाही. मात्र, आज ८ सप्टेंबर रोजी सकाळपासून गोताखोर आणि एसडीआरएफ पथकाकडून पुन्हा शोधमोहीम राबवण्यात आली, तेव्हा दोघांचे मृतदेह सापडले. या घटनेनंतर दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.