अमरावती : अमरावतीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणामधून एका युवतीने दुसरीची हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. अमरावतीच्या राजापेठ ठाण्याच्या हद्दीत 26 वर्षांच्या युवतीची हत्या करण्यात आली आहे. अमरावती शहरात मागच्या 36 तासांमधली ही दुसरी हत्या आहे. दुहेरी प्रेम प्रकरणातून एका युवतीने दुसरीला चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना अमरावतीमध्ये घडली आहे. शुभांगी काळे (वय 26 )असं मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव आहे.
अधिक माहीत अशी की, शुभांगी काळे ही वर्धा जिल्ह्यातील आर्वीची रहिवासी आहे. अमरावतीमध्ये सोसायटीच्या मागे शुभांगीवर सपासप चाकूने वार करण्यात आले, यानंतर शुभांगीने आरडाओरडा करत राहिली त्यामुळे हल्ला करणारी दुसरी युवतीने तिथून पळ काढला.
परिसरातील नागरिकांनी शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं परंतु तिथे तिला मृत घोषित करण्यात आलं. शुभांगीची हत्या माया नगर येथील रहिवासी असलेल्या 25 वर्षांच्या युवतीने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी विकास सुरज नावाच्या युवकाला ताब्यात घेतलं असून आरोपी युवती सध्या फरार झाल्याची माहिती समोर आली आहे.
दोघींचाही जडला एकावरच जीव..
शुभांगी आणि हत्या करणारी युवती या दोघींचंही एकाच युवकावर प्रेम होतं, या प्रेम प्रकरणातूनच शुभांगीची हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात सध्या हत्येचा गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागच्या 36 तासांमधली ही अमरावती शहरातील पाचवी हत्या आहे, त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे.