गडचिरोली : महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे भामरागड तालुक्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीत परिसराचा संपर्क तुटला आहे. पाऊस आणि पुरामुळे परिसरातील सर्व रस्ते बंद झाले होते. अशातच येथील एका गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर होती, तिला रक्ताची गरज होती. त्यादरम्यान महिलेचा जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरने रक्त पोहोचवण्यात आले.
मंतोशी गजेंद्र चौधरी असे गर्भवती महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसर, गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यातील हे प्रकरण आहे. गडचिरोली सुरू असलेल्या मुसळधार पावसादरम्यान वैद्यकीय पथकाने एका महिलेची प्रसूती केली. परंतु, एक युनिट रक्त चढवल्यानंतर या महिलेला आणखी एक रक्ताच्या पिशवीची गरज होती. परंतु, या भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. यामुळे महिलेसाठी आणखी एका रक्ताच्या पिशवीची सोय करणे, एखाद्या आव्हानासारखे होते. मात्र, महिलेची प्रकृती बिघडत असल्याने हेलिकॉप्टरद्वारे तिच्यापर्यंत रक्त पोहोचवण्यात आले.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. यानंतर हेलिकॉप्टरने रक्त आणण्याची तयारी करण्यात आली, मात्र खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने रक्त आणणे कठीण होत होते. अखेर हवामान सुरळीत झाल्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांनी गडचिरोलीहून रक्त घेऊन भामरागडला रवाना केले.
यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचे हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिले. पूर संकटाच्या वेळी तत्परता दाखवत वैद्यकीय पथक रक्तासह पोहोचले आणि महिलेचे प्राण वाचवले. या महिलेची प्रसूती झाली असून बाळ व माता सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.