बुलढाणा : बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. ऑनलाईन असलेली परीक्षा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न जाता बाहेरून देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 14 जून रोजी चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरु होता. मात्र, राज्य शिक्षण मंडळाच्या सतर्कतेने घोटाळा उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची इंग्रजी विषयाची संगणक टंकलेखन परीक्षा सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातही या परीक्षेचे सात केंद्र आहेत. चिखली येथील अनुराधा इंजीनियरिंग कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात 22 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. मात्र, परीक्षा केंद्रात फक्त 14 विद्यार्थी परीक्षा देत होते. मात्र, पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या मुख्यालयात प्रत्यक्ष 22 विद्यार्थ्यांनी अॅक्सेस घेतल्याचं आढळून आले.
दरम्यान, परीक्षा सुरु असताना शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनी परीक्षा केंद्रावरील केंद्रप्रमुखांना व्हिडिओ कॉलद्वारे परीक्षा केंद्रातील विद्यार्थी दाखवण्यास सांगितलं. मात्र, त्यावेळी परीक्षा केंद्रावर फक्त चौदाच विद्यार्थी परीक्षा देत होते. आणि इतर आठ विद्यार्थी कुठे आहेत असं विचारलं असता केंद्रप्रमुख निरुत्तरित झाले. मात्र, प्रत्यक्षात 22 ही विद्यार्थी परीक्षेला बसल्याचं ऑनलाइन अॅक्सेसमध्ये दिसत होते. याचा अर्थ इतर ८ विद्यार्थी हे घरून किंवा इतर ठिकाणाहून परीक्षा देत असल्याचं स्पष्ट झाले.
विद्यार्थी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले?
या परीक्षेचा युजर आयडी आणि पासवर्ड हा फक्त केंद्र प्रमुख यांच्याकडेच असतो. तरीही विद्यार्थ्यांनी बाहेरून परीक्षेला जॉईन कसे झाले? त्यामुळे बुलढाणा जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी तात्काळ हे केंद्र गाठून हा सगळा गैरप्रकार उघडकीस आणला. बुलढाणा जिल्ह्यातील सातही परीक्षा केंद्रावर अशाच प्रकारे हा घोटाळा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी यांना हा प्रकार सांगण्यात आला आहे. याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.