वर्धा : राज्यात आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीने जोर पकडला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मैदानात उतरून रणनीती आखत आहेत. राज्यात महाविकास आघाडीविरोधात महायुती असाच सामना रंगण्याची शक्यता असताना मात्र या निवडणुकीमध्ये मनसेसोबतच तिसऱ्या आघाडीनं सुद्धा उडी घेतली आहे. त्यामुळे ही निवडणुक मोठी चुरशीची होणार आहे. तिसऱ्या महाशक्ती आघाडीनं विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आमदार बच्चू कडू यांनी याबाबत माहिती दिली आहे.
वर्ध्याच्या आर्वी विधानसभा मतदारसंघाकरिता तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी घोषित केला आहे. जयकुमार बेलखेडे हे तिसऱ्या महाशक्ती आघाडीचे विदर्भातील पहिले उमेदवार ठरले असून बच्चू कडू यांनी जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा केली. दरम्यान इतर पक्षांसारखे बंद खोलीत पैशांची देवाणघेवाण करून उमेदवारी जाहीर करत नाही. तर आम्ही जाहीर सभेतून उमेदवारी जाहीर करणारे आहोत, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी विरोधकांना लागवला आहे.