यवतमाळ : जलसंधारण मंत्री तथा यमतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या गाडीचा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. अपघातानंतर गाडीतील एअरबॅग्ज खुल्या झाल्यामुळे संजय राठोड सुदैवाने बचावले असून दिग्रस जवळील कोपरा येथे हा अपघात झाला आहे. राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. रात्री दोन ते अडीच वाजता ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय राठोड 3 ऑक्टोबर रोजी यवतमाळच्या दौऱ्यावर होते. रात्री प्रवास करत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर लगेच गाडीतील एअरबॅग्ज उघडल्या गेल्या. त्यामुळे सुदैवाने संजय राठोड बचावले आहेत. मात्र, या अपघातात पिकअपचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.
अपघात नेमका कसा झाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पोहरा देवीला भेट देणार आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे पोहरादेवी येथे आले होते. ते रात्री 2 ते अडीच वाजेदरम्यान ते पोहरादेवी येथून निघाले. ते पोहरादेवी येथून यवतमाळकडे जात असताना मात्र आर्णी येथील कोपरा गावाजवळ संजय राठोड यांच्या वाहनाने समोरच्या पिकअपला धडक दिली. त्यातून हा अपघात झाला आहे. या अपघातात पिकअप तसेच संजय राठोड यांच्या वाहनाची मोठी हानी झाली आहे. अपघातानंतर पिकअप वाहन पलटी झाले. ज्यामुळे पिअकपचा चालक जखमी झाला आहे.