अकोला : राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हटलं कि ते आपल्या पक्षासाठी जीव ही द्यायला तयार असतात. नेत्यासाठी तर ते सदैव हजरच असतात. याच प्रेमातून कार्यकर्त्यांकडून बऱ्याच गोष्टी केल्या जातात. असाच काहीसा प्रकार अकोला जिल्ह्यातून समोर आला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलात माखलेल पाय धूत असताना एक कार्यकर्ता दिसत आहे. कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे नाना पटोले वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. या कार्यक्रमानंतर नाना पटोले यांनी वाडेगावात मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं.
यावेळी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर पावसामुळे मोठा चिखल झाला होता. प्रदेशाध्यक्ष नाना पटेल यांनी चिखलातून जात संत गजानन महाराजांचा दर्शन घेतलं. मात्र दर्शनानंतर आपल्या गाडीजवळ आलेल्या नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं हाताने धुतले. विजय गुरव असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो शेगाव येथील रहिवासी आहे. नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुण्याचे या कृतीमूळे मात्र आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविली जात आहे.
नाना पटोले यांना अमोल मिटकरी यांचा टोला
नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्यानं धुतल्याचा प्रकारा नंतर या कृतीला राजकीय वर्तुळातून विरोध होताना दिसत आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे. नेते अशाच प्रकारे कार्यकर्त्यांना वापरून पाय धुवायला लावत असतील तर हे कृत्य निंदाजनक आहे, यातून पक्षाची कार्यकर्त्याप्रती काय धारना आहे, हे या माध्यमातून दिसून येत असल्याची टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. हा अतिशय संतापजनक प्रकार असून, नाना पटोलेंनी स्वतः ला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये. अशी टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे.