मुंबई: राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना अमरावती जिल्ह्यातून (Amravati News) समोर आली असून, प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू (Bachhu Kadu) यांच्याविरोधात खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
तक्रारदार अभिजित तायडे (वय 40) यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांना अपघाताचा बनाव करून ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. अभिजित तायडे हे अचलपूरचे भाजप आमदारप्रवीण तायडे यांचे बंधू आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, बच्चू कडू आणि त्यांचे सहकारी शुभम उर्फ गोलू माहोरे यांनी मिळून हा कट आखला.
या प्रकरणातील महत्त्वाचा भाग म्हणजे एक ऑडिओ रेकॉर्डिंग. तक्रारदारांनी संबंधित संभाषणाची नोंद पेनड्राईव्हमध्ये पोलिसांकडे सुपूर्द केली असून, त्यात कथित कटाची चर्चा असल्याचा दावा केला जात आहे. पोलिसांनी हा पेनड्राईव्ह जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवला आहे.
या तक्रारीच्या आधारे चांदूर बाजार पोलिसांनी बच्चू कडू आणि शुभम माहोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 55, 58 आणि 61 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपांची सत्यता पडताळली जात आहे.
अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंब यांच्यातील राजकीय संघर्ष जुना आहे. त्यामुळे या प्रकरणामागे राजकीय वैमनस्य आहे का, की अन्य काही कारण, याचा तपास पोलीस करत आहेत.
या घडामोडीमुळे अमरावती जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली असून, पुढील तपासातून नेमके सत्य काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






