Maharashtra Politics : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागलेले दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी सद्या दौरे, बैठका, संवाद यावर जोर दिला आहे. अशातच आता विदर्भात भाजपनं एक अंतर्गत सर्वे केला आहे. यामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेत विदर्भात महायुतीला फक्त 25 जागा मिळत असल्याची माहिती मिळत आहे.
कुणाला किती जागा मिळणार?
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीला विदर्भात मोठा फटका बसणार आहे. विदर्भात भाजपला 18 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 5 जागा व अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर नागपूर जिल्ह्यात भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे. सध्या महायुतीकडे विदर्भातूल 62 पैकी 39 आमदार आहेत. तर नागपूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपाला फक्त 4 जागा मिळत असल्याचे सर्व्हेत म्हटले आहे.
2019 मध्ये 7 आमदार भाजप महायुतीकडे होते. भारतीय जनता पक्षाला विदर्भात 62 पैकी 2014 मध्ये 42 व 2019 मध्ये 29 जागा मिळाल्या होत्या. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे 2019 मध्ये 5 आमदार निवडून आले होते. त्यात चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या, तर शिवसेनेकडे 2019 मध्ये 3 जागा होत्या. तर 3 अपक्षांची शिवसेना शिंदे गटाला साथ होती. त्यामुळं विदर्भात शिंदेच्या शिवसेनेकडे 6 आमदार आहेत.
महायुतीमध्ये जागावाटपावरुन पेच?
सर्वेतून अशी माहिती समोर येत असतानाच, दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच सुद्धा निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीमध्ये जवळपास 40 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत. याच आठवड्यात राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन वादातीत मतदारसंघाबाबतचा निर्णय सामोचाराने सोडवण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवली आहे. अमित शाहा यांनी पुढील दहा दिवसात अंतिम चर्चेबाबत दिल्लीला येण्याबाबत महायुतीतील नेत्यांना सूचना केल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.