गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात एसटी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. सध्या बचाव कार्य सुरु असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. दरम्यान, अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. यावेळी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
अपघात कसा झाला?
अपघातात उलटलेली बस महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) होती. ही बस भंडारा येथून साकोली लाखनी मार्गे गोंदियाकडे जात होती. या बसचा क्रमांक MH 09 EM 1273 असा आहे. बस समोर वळण घेत असताना अचानक समोरून एक दुचाकी आली. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने वाहनाला कट मारल्याने बसचे नियंत्रण सुटून बस उलटली.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर बस चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. प्रवाशांच्या माहितीवरून रुग्णवाहिका आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातग्रस्त बसला उचलण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली आणि ती तेथून काढण्यात आली. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. फरार चालकाला लवकरच अटक करण्यात येईल.