नागपूर : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री गोळ्या घालून हत्या करण्यात आली. झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. बाबा सिद्दीकी यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक जण अद्याप फरार असून त्याची ओळख पोलिसांना पटल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अनेक प्रतिक्रया समोर येऊ लागल्या आहेत. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. त्यांच्या कार्यालयापुढे येऊन पोलीस संरक्षण असताना गोळी झाडली जात असेल तर हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. वाय दर्जाची सुरक्षा असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यावर जर अशाप्रकारे गोळीबार होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे.
बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण..
सध्या राज्यामध्ये कायदा-सुव्यवस्थेची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, कोण सुरक्षित आहे हा प्रश्न उपस्थित झाला आहे. सत्ताधाऱ्यांना बुलेटप्रूफ जॅकेट घालण्याची वेळ आहे. सत्ताधाऱ्यांनी फलक लावून लोकांना सांगायला पाहिजे की, आपली सुरक्षा आपण करा, असे असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. सत्ताधारी योजना व सत्ता मिळवण्यात व्यस्त आहे. त्यामुळे पोलिसांचे इंटेलिजन्स काम करत नाही.
महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले नाही तर गुंडांचे राज्य आहे. विरोधी पक्षनेता म्हणून मी बाबा सिद्दिकी यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याची शक्ती मिळेल, अशी प्रार्थना करतो, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.