मालेगाव (वाशीम): शेतीच्या वादातून महिलेला विळा मारून जखमी केल्याची घटना १० जानेवारी रोजी मालेगाव तालुक्यातील चिवरा शेतशिवारात दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, चंद्रप्रभा लोखंडे (रा. वसमत) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, चिवरा शेतशिवारामध्ये त्यांचे वडील रामा आनंदा गायकवाड हे सैनिक असल्यामुळे त्यांना सरकारकडून दहा एकर जमीन मिळाली होती. त्यांच्या मृत्यूनंतर ही जमीन आई शशिकला रामा गायकवाड यांच्या नावाने झाली. ती काही दिवसांपूर्वी मरण पावल्यामुळे फिर्यादीच्या आत्याने ही शेती आमची असून, प्रकरण कोर्टात नेले.
यावर्षी आत्या व तिचा नातू विष्णू यांनी या शेतात जबरीने दोन एकर करडी व आठ एकरांमध्ये तूर पेरली. १० जानेवारी रोजी त्या शेतात गेल्या असता शेतामध्ये विष्णू राजू थोरात, रवी राजू थोरात, बबन सोपान काकडे, तीन महिला व इतर अनोळखी तीन ते चार जण शेतातील तूर कापत असल्याचे दिसून आले. तूर पीक का कापता, अशी विचारणा केली असता ७ ते ८ जणांनी लोखंडी विळ्याने हातावर मारून लाथाबुक्क्या व लोखंडी पाइपने मारून जखमी केले. अशा फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस करीत आहेत.