वर्धा : वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये एक अफलातून प्रकार समोर येत आहे. आर्वी येथील विठ्ठल वॉर्डमध्ये पहाटे एका घराच्या गेटवर पिशवीसह धमकी देणारे पत्र अडकविले गेले आणि त्यामुळे आर्वीतील एका कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण आर्वीकरांची झोप उडविणारा प्रकार घडला आहे. या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित वस्तूला असलेल्या वायर्स कापून पोलिसांनी ती निकामी केली आणि मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार मुला-मुलीचे साक्षगंध झाल्यावर या लग्नाला विरोध करणाऱ्या प्रेमविराने हा अफलातून प्रकार केला आहे.
नेमकं प्रकरण काय?
आर्वीतील ५७ वर्षीय वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराबाहेरील गेटवर बॉम्बसदृश्य वस्तूची पिशवी अडकवली होती. या पिशवीमध्ये टायमर आणि बॅटरी अशा गोष्टी होत्या. तसेच पिशवीच्या आतमध्ये एक आणि बाहेर एक चिठ्ठी ठेवण्यात आलेली होती. ‘हात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल,’ असं बाहेरील चिठ्ठीत लिहिलेलं होतं. पिशवीतील टायमर सदृश्य गोष्टीवर ७.२९ असा टाइम दिसत होता.
याच टायमरच्या बाजूला बॅटरीही होती. हा प्रकार पाहून घर मालकीण घाबरली आणि तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या पिशवतील वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचे मिश्रण त्याचप्रमाणे माचिसमध्ये वापरतात तो गुल लावलेला कापडही होतं.
वंदना आणि ज्ञानेश्वर यांच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला होता. तो अमरावतीमधील नवोदय विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या साखरपुड्याशी सर घटनेचा संबंध असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या मुलीशी कारमोरे यांच्या मुलाचा साखरपुडा झाला तिच्या प्रियकरानेच ही बॉम्बसदृश्य वस्तू घरासमोर लावल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रेयसीसाठी या तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरापुढे ही बॉम्बसदृश्य गोष्ट लावल्याचा संक्षय पोलिसांना आहे.