अकोला : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी १३५ उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, मनसेला अकोला पश्चिम मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या सर्वात तरुण उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रशंसा अंबेरे यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाने 25 वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून निवडणूक लढवता येईल अशी अट आहे. मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांच वय 25 पेक्षा कमी असल्याने त्यांचा नामांकन अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहे. अंबेरे यांना 25 वर्ष पूर्ण होण्यासाठी 24 दिवसांचा अवधी बाकी असल्यच्या कारणाने त्यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे.
दरम्यान, मनसेकडून राज्यात विधानसभा निवडणुकीत २५० जागा लढवण्याची घोषणा केली होती. मात्र मनसेकडून १३५ उमेदवार जाहीर करण्यात आले असून त्यांनी अर्ज देखील दाखल केले आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला गेल्या दोन विधासनभा निवडणुकांमध्ये फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. आता मात्र १३५ जागा लढवणाऱ्या मनसेला किती जागांवर यश मिळतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अकोला पश्चिम मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. काँग्रेसचे माजी राज्यमंत्री अहजर हुसने यांचा मुलगा झिशान हुसेन यांनी वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या राजेश मिश्रा यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे. तर भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हरीश आलीमचंदानी यांनी अपक्ष, तर माजी शहराध्यक्ष अशोक ओळंबे पाटील यांनी प्रहारकडून उमेदवारी दाखल केली आहे.