गडचिरोली : गडचिरोलीत माओवाद्यां हत्या केल्याची माहिती समोरच्या आली आहे. नक्षलवाद्यांकडून संपूर्ण दंडकारण्यामधे 28 जुलै ते 3 ऑगस्टपर्यंत नक्षल शहीद सप्ताह पाळला जात असतो. माओवादी नेता चारू मजुमदार, पेद्दी शंकर आझादसह आजवर चकमकीत ठार झालेल्या माओवादी नेत्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माओवादी दरवर्षी हा शहीद सप्ताह साजरा करत असता. या काळात नक्षली मोठ्या प्रमाणात घातपात घडविण्याच्या प्रयत्न करत असतात.
भामरागड तालुक्यातील मिरगुडवांचा येथील लालू मालू दुर्वा (वय 40) या व्यक्तीची माओवाद्यांनी हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या आठवड्याभरातली ही सलग दुसरी हत्या आहे. या हत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आठवड्याभरातील दुसरी हत्या..
गडचिरोलीच्या भामरागड तालुका मुख्यालयापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुर्गम अशा मिरगुडवांचा गावात ही हत्या करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे माओवादी संघटनेच 28 जुलै ते 3 ऑगस्ट पर्यत शहीद सप्ताह सुरू आहे. याच पाश्वभूमीवर ही हत्या करण्यात आली आहे. आठवड्याभरातच नक्षलवाद्यांकडून दुसरी हत्या करण्यात आली आहे. 26 जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथील जयराम गावडे याची पोलीस खबरी असल्याचं संसशयावरून हत्या करण्यात आली होती. 26 जुलैच्या मध्यरात्रीच्या दरम्यान नक्षल्यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून ही हत्या केली होती.
त्यानंतर परिसरात दहशत निर्माण व्हावी, या अनुषंगाने मृतदेह मुख्य रस्त्यावर आणून ठेवला होता. ही घटना उजेडात येताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना ताजी असताना तशीच एक हत्येची घटना समोर आली आहे. त्यामुळे माओवादी दंडकारण्यात पुन्हा सक्रिय झाले आहेत का? अशी शंका उपस्थित केली जात आहे.