नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री आणि शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांच्या गाडीवर सोमवारी रात्री हल्ला झाला होता. या घटनेनंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. त्यांच्या गाडीवर दगड फेकण्यात आला होता. यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला होता. या घटनेबाबत आता भाजपचे नेते परिणय फुके यांनी या संपूर्ण प्रकरणात काहीतरी काळबेरं असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
परियण फुके म्हणाले की , अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला ‘फेक दगडफेक’ आहे. सगळं स्क्रीप्टेड झालं असं दिसत आहे. पोलिसांनी तातडीने एसआयटी नेमून याप्रकरणाची चौकशी सुरु करावी. उद्याच्या मतदानावर याचा परिणाम होणार नसून चौकशीत सत्य बाहेर आले पाहिजे. सलील देशमुख यांचा पराभव होत असल्याने अनिल देशमुख यांनी स्वतःवर ‘फेक दगडफेक’ केली, असा आरोप परिणय फुके यांनी यावेळी केला.
याप्रकरणी परिणय फुके यांनी काही प्रश्न सुद्धा उपस्थित केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांच्या गाडीचा वेग कमी का होता? अनिल देशमुख यांच्यासोबत 10 वर्षांपासून सोबत असणारा बॅाडीगार्ड नेमका कालच मागच्या गाडीत का बसला होता? घटनेनंतर बॅाडीगार्ड तिथे वेळेत का पोहोचला नाही? त्यांनी आरोपींवर फायरिंग का केली नाही? गाडीवर आढळलेला 10 किलोचा दगड फेकून मारणं शक्य आहे का? 10 किलोचा दगड जवळून येऊन गाडीवर टाकलेला दिसत आहे. 10 किलोचा दगड 20 फुटांवरून कसा फेकला जाऊ शकतो? दगड कारच्या काचेच्या खाली ठेवलेला दिसतोय, असे परिणय फुके यांनी यावेळी म्हटले.
मुलाचा पराभव दिसत असल्यानेच हल्ल्याचा बनाव…
अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हा निवडणुकीत पराभूत होणार आहे, हे समोर दिसत असल्याने अनिल देशमुख असं काहीतरी करतील, हे भाकीत मी काटोलच्या सभेत वर्तवविले होते. विदर्भात महाविकास आघाडीचे बरेच मोठे नेते पराभवाच्या छायेत असून त्यामुळे तेही अनिल देशमुखांप्रमाणे करु शकतात. पोलिसांनी याची दखल घ्यावी. अशाच प्रकारे तुमसरमध्ये चरण वाघमारे, नाना पटोले, मध्य नागपूर मध्यचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके, विजय वडेट्टीवार, गोंदियाचे काँग्रेस उमेदवार गोपालदास अग्रवाल अशाप्रकारे काही करु शकतात. आज रात्री किंवा उद्या हे पाच नेते असं काही करु शकतात, असे परिणय फुके यांनी म्हटले. दरम्यान, अनिल देशमुख यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आज दुपारी घरी सोडले जाण्याची शक्यता आहे.