नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर डागलेलं टीकास्त्र निवडणूक जवळ आल्यामुळे केलेलं असावं, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. तसेच, शरद पवारांवर ज्यावेळी मोदींनी टीका केली, त्यावेळी त्या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावर बोलताना अजित पवारांनी कार्यक्रमातून उठून जायला हवं होतं किंवा मोदींचं वक्तव्य दुरुस्त करायला हवं होतं, त्यांनी मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती, असंही अनिल देशमुखांनी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते. त्यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील काकडी गावात मोदींची जाहीर सभा पार पडली. मोदींनी सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा प्रश्न मंचावरुन मोदींनी उपस्थित करत पवारांवर टीका केली. विशेष बाब म्हणजे, यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीकास्त्र डागलं. ज्यावेळी नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली, त्यावेळी अजित पवार यांनी स्टेजवरून उठून जायला हवं होतं किंवा मोदींना दुरुस्त करायला हवं होतं, असं अनिल देशमुख म्हणाले.