नागपूर: माझ्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांच्याविरोधात ३ वर्षांपूर्वी खोट्या आरोपांचे प्रतिज्ञापत्र करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा दबाव होता. त्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात माझ्याकडे पेनड्राईव्हमध्ये पुरावे आहेत. योग्यवेळी ते मी जनतेसमोर आणणार असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितले.
ज्यावेळी मुंबई येथे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलियासमोर बॉम्ब ठेवण्याचे प्रकरण झाले आणि याचा तपास पोलीस करीत असताना त्या प्रकरणात तेव्हाचे मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे मुख्य आरोपी असल्याचे समोर आल्यावर त्यांची बदली केली व नंतर निलंबित केले. त्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून माझ्यावर खोटे आरोप केले.
आरोप केल्यानंतर चौकशीसाठी ते कधीही समोर आले नाहीत. उलट त्यांनी कोर्टासमोर शपथपत्र लिहून दिले की, अनिल देशमुख यांच्यावर मी जे आरोप केले त्याचे कोणतेही पुरावे माझ्याकडे नाहीत आणि केवळ ऐकीव माहितीवर मी हे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांनंतर माझ्यावरील कारवाई टाळण्यासाठी ३ वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार आणि अनिल परब यांच्यावर आरोप करण्यासाठी प्रतिज्ञापत्र करावे, असे फडणवीस यांनी सांगितले होते. ३ वर्षांपूर्वी जर मी हे आरोप केले असते, तर त्यावेळेसच तत्कालीन महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असेही अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
पुरावे जनतेसमोर आणावेत
माझ्याविरोधात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे मी शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलल्याचे पुरावे असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. जर त्यांच्याकडे माझ्याविरोधात काही पुरावे असतील, तर ते त्यांनी जनतेसमोर आणावे, असे आव्हानसुद्धा अनिल देशमुख यांनी यावेळी केले.