बुलढाणा : बुलढाण्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. विद्युत खांबाचा शॉक लागून 16 वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोमल पहुरकर असे मृत पावलेल्या तरुणीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. विद्युत खांबात वीजेचा प्रवाह असल्याची माहिती वायरमनला दिली होती. मात्र, वायरमनकडून दुर्लक्ष झाल्यानं एका निष्पाप मुलीला जीव गमवावा लागला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विद्युत खांबात वीजेचा प्रवाह असल्याची माहिती वायरमनला कळवण्यात आली होती. मात्र, त्याकडे वीज वितरण विभागाने दुर्लक्ष केले. एमएसईबीने विद्युत खांबाची दुरुस्ती वेळेत न केल्याने कोमल पहुरकर या १६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, कोमल पहुरकर या तरुणीच्या मृत्यूनंतर वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. वायरमनवर कारवाई करण्याची मागणी वांचीतकडून करण्यात येत आहे. तसेच मुलीच्या कुटुंबाला तात्काळ ५ लाख रुपयाची मदत करा, तसेच मुलीच्या परिवारातील एका व्यक्तीला महावितरण कार्यालयात शासकीय कर्मचारी म्हणुन घ्यावे अशीही मागणी वंचित कडून करण्यात आली आहे. तसेच 8 दिवसात ही मागणी मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशाराच वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.