अमरावती : अमरावती शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर मोठा जमाव चालून आला. यावेळी पोलिसांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. हा धक्कादायक प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नागपुरी गेट पोलीस ठाण्यात घडला आहे. या प्रकाराने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
उत्तर प्रदेशातील गाजियाबाद स्थित दासनादेवी मंदिराचे विश्वस्त यती नरसिंह आनंद सरस्वती यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले आहेत. त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी संतप्त जमावाने केली आहे. तसेच जमावाने पोलीस स्टेशनच्या तोडफोडसह जाळपोळ देखील केल्याची माहिती समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर केला असून दगडफेकीत आतापर्यंत २९ पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
दरम्यान, मध्यरात्री १ वाजेनंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत कलम १४४ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
यती नरसिंह नंद सरस्वती यांनी २९ सप्टेंबर रोजी गाजियाबाद येथे बोलत असताना विशिष्ट धर्मीयांविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी अंदाजे ४०० ते ५०० लोकांचा मोठा जमाव शुक्रवारी रात्री नागपुरी गेट पोलीस ठाण्यावर चालून आला. यावेळी पोलिसांनी या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, काही लोकांनी बाचाबाची सुरु करत पोलीस ठाण्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावावर अश्रुदुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगड आणि विटांचा मारा सुरु केला. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर पोलिसांनी लाठीमार केला. आतापर्यंत या घटनेत २९ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.