अमरावती : स्वामी राम राजेश्वराचार्य महाराजांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या पत्रामुळे संपूर्ण अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
आज नही तो कल…अंत निश्चित है…
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या 22 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे अवघा देश श्रीराममय झाला आहे. या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण अमरावतीच्या रुक्मिणी विदर्भ पिठाचे पीठाधीश्वर जगद्गुरु स्वामी राम राजेश्वराचार्य महाराज यांना देखील देण्यात आले आहे. अयोध्येत जाण्यासाठीची तयारी सुरु असताना अचानक त्यांना जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले. सध्या राजेश्वराचार्य महाराजांच्या अनुयायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आप जो अयोध्या.. अयोध्या कर रहे हो, वह आपको महंगा पडेगा. आज नही तो कल, कुछ दिनो मे आपका अंत निश्चित है.. अशा आशयाचे पत्र त्यांना पाठवण्यात आले आहे. मात्र हे पत्र नेमके कुणी पाठवले? याबाबत त्या पत्रात उल्लेख केलेला नाही. याप्रकरणी महाराजांच्या अनुयायांनी कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडे तक्रार दाखल
या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता तत्काळ पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली आहे. सर्व पदाधिकारी अयोध्येत जाण्यासाठीच्या तयारीत होते, अचानक एक पत्र आम्हाला आढळून आले. त्यामुळे एसपींना भेटलो असल्याचे महाराजांच्या अनुयायांनी सांगितले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेता, जगद्गुरु राम राजेश्वराचार्य महाराजांना तात्काळ पोलीस संरक्षण मिळायला हवे, अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना विदर्भपीठ आणि जिल्ह्यातील विविध संघटनांनी दिले आहे.
Death threat letter to Swami Ram Rajeswaracharya Maharaj