अमरावती : भाविक महिलेचा अश्लील व्हिडीओ तयार करून लैंगिक शोषण करणाऱ्या अमरावतीतील अध्यात्मिक गुरुविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिवसा तालुक्याच्या मार्डी येथील आश्रमातील भोंदु गुरुदास बाबा उर्फ सुनील कावलकर विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर भोंदू बाबा फरार झाला आहे. तापलेल्या तव्यावर बसून भक्तांना आशिर्वाद देणारा बाबा म्हणून गुरुदास बाबा प्रसिद्ध झाला होता.
नेमकं काय झालं?
गुरुदासबाबा म्हणून ओळख असलेला भोंदूबाबा सुनील कावलकर याचा आश्रम आहे. आपल्या समस्या सोडूवून घेण्यासाठी जनता या बाबाच्या आश्रमात येते. मध्यप्रदेशातील जबलपूर येथे राहणारी एक महिला आपल्या व्यसनी पतीच्या त्रासाला कंटाळून कौटुंबिक कलह थांबावा या अपेक्षेने तेथे आली होती. हा गुरुदासबाबा अंगारा देतो आणि पौर्णिमेला पूजापाठ करून आपली समस्या सोडवतो हेच तीला सांगण्यात आले होते.
त्याप्रमाणे, मार्च 2023 मध्ये पीडित महिला गुरुदासबाबाच्या आश्रमात आली. तिचे दुःख सांगितल्यावर या भोंदूबाबाने तीला अंगारा आणि प्रसाद देऊन मी जबलपूरला आलो की मला भेटायला ये असे सांगितले. मे महिन्यात दोन वेळा गुरुदासबाबा जबलपूरला गेला असता तीला एकट्याला बोलावून तिची भेट घेतली. तेव्हापासून तीचे मार्डी येथे येणे-जाणे सुरू झाले. गुरुदासबाबाने तीला सहा-सात महिने आश्रमातच रहावे लागेल असे सांगितले आणि ती तयारही झाली.
दरम्यान, तुझा पती सुधारला तर ठीक अन्यथा मीच तुझ्याही लग्न करणार असे सांगून गुरुदासबाबा ने खाण्यात अंगारा देऊन जवळपास तीन महिन्यापर्यंत तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान एक दिवस या दुराचारी बाबाचा मोबाईल फोन तिच्या हाती लागला. आता त्या फोनमध्ये तिच्यावरील अत्याचारची चित्रफीत त्याने बनवलेली असल्याचे तिचे म्हणणे आहे. घडलेला प्रकार लक्षात आल्याने तीने आश्रमात राहणार नाही असे सांगितले. गुरुदासबाबाने 2 जानेवारीला पिडीतीला नागपूरपर्यंत नेऊन सोडले. मे 2023 पासून 2 जानेवारी 2024 पर्यंत ती आश्रमात होती. या दरम्यान तिचे कुटुंबात काहीच चांगले झाले नाही. त्यामुळे तिची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने गुरुदासबाबा याला फोन केला आणि विचारणा केली असता गुरुदासबाबाने तिलाच धमकावले.
यावरून पीडित महिलेने कुन्हा पोलिस स्टेशन गाठून आपल्यावर झालेल्या बाबीची जबानी दिल्यावरून कुन्हा पोलिस स्टेशनमध्ये भोंदू गुरुदासबाब उर्फ सुनील जानराव कावलकर (वय 47) यावर अत्याचार, धमकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी गुरुदासबाब हा फरार असून त्याचा कसून शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
त्यानंतर पीडितेने अमरावतीतील तिवसा तालुक्यातील कुऱ्हा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली. पोलिसांनी भोंदूबाबा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच आरोपी भोंदू बाबा आश्रमातून फरार झाला आहे. फरार भोंदू बाबाला शोधण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.