गोंदिया : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी आणि अविरोधक एकमेंकावर आरोप प्रत्यारोप करत आहे. नेते मंडळी दावे-प्रतिदावे करताना दिसत आहेत. अशातच बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकासकामं होत आहेत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखवली आहे. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर ते बारामतीमधून निवडणूक लढणार नाहीत का? अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. आता याच मुद्द्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टीका करत टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी म्हटलं होतं की ते बारामती मधून विधानसभेचे निवडणूक लढणार नाही, यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांना आग्रह केल्यानंतर अजित पवार हे बारामतीतूनच निवडणूक लढतील, असे ते म्हणाले. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्व पटेल यांच्या बालेकिल्लांमध्ये शरद पवार गटाची शिवस्वराज यात्रेचे आगमन झाले होते. त्यावेळी जयंत पाटील बोलत होते.
त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार ते बोलतात : जयंत पाटील
अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना मी शरद पवारांना सोडून चूक केली, असे विधान केले होते. त्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार हे काय बोलतात त्यासाठी त्यांच्याकडे कन्सल्टंट आहेत आणि कन्सल्टंट हे काय सांगतात त्यानुसार ते बोलत असतात. ते स्वतःच्या बुद्धीने आणि स्वतःच्या इच्छेने बोलत नाही त्यांचे कन्सल्टंट जे सांगतात त्यानुसार ते बोलतात, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे.
आम्ही यावर योग्य वेळी बोलू..
नागपूर अपघात प्रकरणांमध्ये भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या गाडीने अपघात झाला. याविषयी बोलण्यासाठी महायुतीचे नेते गप्प आहेत. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, आता याबाबतीत खराखुरा तपास पोलिसांनी करावा, सर्व सीसीटीव्ही तपासावे आणि त्यानंतरच आम्ही यावर योग्य वेळी बोलू,असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
घाबरल्यामुळे आमचे पोस्टर फाडले- जयंत पाटील
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची शिव स्वराज यात्रा तिरोडा येथे येणार होती. परंतु त्याआधीच काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांचे पोस्टर फाडण्यात आले. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निश्चितपणाने या विधानसभा क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मोठे अस्तित्व आहे. त्यामुळे येथील विरोधी लोक घाबरलेले आहेत आणि आमचा पक्ष या ठिकाणी वाढतो आहे, त्यामुळे काही लोकांनी आमचे पोस्टर फाडले असतील. त्यांच्या मी निषेध करतो, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.