गोंदिया : अदिती तटकरे या गोंदिया जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री होणार अशी माहिती समोर आली आहे. धर्माराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अदिती तटकरे यांचा नावावर शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि गोंदियाचे पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी गोंदिया जिल्ह्याचं पालकमंत्री पद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, गोंदियाचं पालकमंत्रीपद सोडण्याबाबतच्या निर्णयाची माहिती अजित पवार यांना दिली असल्याचंही त्यांनी गुरुवारी बोलताना सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांनी प्रकृतीच्या कारणामुळं आणि गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करायचं असल्यानं आपण हा निर्णय घेतल्याचं म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्रि पद सोडणार असल्याचं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलं. धर्मराव बाबा आत्राम यांची नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचा पराभव झाला होता. या मतदारसंघात काँग्रेसचे प्रशांत पाडोळे विजयी झाले. या जागेवर भाजपचा उमेदवार असला तरी भंडारा-गोंदियाची जबाबदारी प्रफुल्ल पटेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसवर होती. मात्र, तिथे महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे आत्राम यांनी अचानक गोंदियाचा पालकमंत्री पद सोडण्याचा जो निर्णय घेतला त्यामागे काही राजकीय कारणं आहेत का? असा संशय निर्माण झाला आहे.
धर्मराव बाबा अत्राम अजित दादांसोबत
महाविकास आघाडीच्या काळात धर्मराव बाबा आत्राम हे मंत्री होते. याशिवाय अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यावेळी अजित दादांची साथ देण्याचा निर्णय घेतला होता.