कोवाळी: काटोल तालुक्यातील जाई येथील आदर्श शिक्षकाला विद्यार्थ्यांना वर्गात अ, आ, ई, इंचे धडे देताना हृदयविकाराचा धक्का बसला. अचानक गुरुजी वर्गात कोसळल्याने विद्यार्थी घाबरले. त्यांनी अन्य शिक्षकांना माहिती दिली. तातडीने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना नजीकच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. ही घटना शुक्रवारी २० सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. त्यांचा मृत्यू वाईवासीयांसह तालुका शिक्षण क्षेत्राला चटका लावून गेला आहे.
विजय धवड (५७, रा.काटोल) असे मृत आदर्श शिक्षकाचे नाव आहे. त्यांना ५ सप्टेंबरला शिक्षकदिनी जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच शिक्षण विभागातही हळहळ व्यक्त करण्यात आली. विजय धवड हे वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. ते नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर दुपारी एक वाजता शिकवणीला गेले असता वर्गातच कोसळले. सहकारी शिक्षक विजय तभाने यांनी तातडीने शाळेतील अन्य शिक्षक व गावकऱ्यांच्या मदतीने कचारीसावंगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना नेले. येथे त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
धवड यांचे भाऊ संजय शंकर धवड यांना घटनेची माहिती कोंढाळी पोलिसांनी दिली. पोलिसांनी मृत विजय धवड यांच्या मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह काटोल ग्रामीण रुग्णालयात पाठवला. कोंढाळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार राजकुमार त्रिपाठी करीत आहे.