-अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : नायगांव (बु.) ता. वणी येथील अल्पवयीन पिडीतेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पांढरकवडा येथील जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पाचभाई यांनी आरोपी कवडु दौलत बोबडे (वय 39) यांस 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व द्रव दंड ठोठावला. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रशांत मानकर यांनी शासनाची बाजू मांडली.
नायगांव (बु.) ता. वणी येथील अल्पवयीन पिडीतेची आई 18 मार्च 2020 रोजी मजुरी करण्यास गेली होती. तसेच वडील हे चालक असल्याने ते सुद्धा बाहेर गेले होते. त्यामुळे अल्पवयीन पिडीता ही घरी एकटीच खेळत होती. तेवढ्यात आरोपी कवडु दौलत बोबडे (वय 39) याने अल्पवयीन पिडीतेला पिण्याचे पाणी मागितले. पिडीतेने पाणी आणून दिले. नंतर आरोपी कवडू याने अल्पवयीन पिडीतेला कडेवर उचलून न्हानी घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पिडीतेला गुप्तांगात त्रास होत असल्याने तिला नायगांव (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती बरी नसल्याने तिला नंतर घुग्गुस येथील डॉ. दास यांचे हॉस्पिटल, तदनंतर चंद्रपूर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
घडलेली घटना अल्पवयीन पिडीतेने आई वडीलांना सांगितल्यानंतर पिडीतेच्या आईने शिरपूर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार दाखल केली. या वरून आरोपी कवडु दौलत बोबडे विरुद्ध भादंवि कलम 450, 376 (AB) सह कलम बाल लैंगिक अत्याचार पासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6 व 8 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक ज्ञानेश्वर धावळे यांनी करुन पांढरकवडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सदर प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले.
सदर प्रकरणात भादंवि कलम 376 (AB) मध्ये 20 वर्ष सश्रम कारावास, भादंवि कलम 450 अंतर्गत 3 वर्ष सश्रम कारावास व 1000 रुपये द्रव दंड, POCSO कलमातंर्गत 20 वर्ष सश्रम कारावास व 3000 रुपये द्रव दंड ठोठावण्यात आला. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त शिक्षा भोगावी लागणार आहे. सदर सर्व शिक्षा आरोपीला एकत्रितपणे भोगाव्या लागणार आहे. दंडाच्या रकमेतून पिडीतेला नुकसान भरपाई म्हणून 5000 रूपये देण्याचे आदेश जिल्हा न्यायाधीश 1 तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत पाचभाई यांनी दिले आहे.
शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. प्रकाश मानकर यांनी बाजू मांडली. तर आरोपी तर्फे ॲड. सिद्धार्थ लोढा व ॲड. वंदना लोढा यांनी काम पाहिले.