भंडारा : भंडारा जिल्ह्यातून एक भीषण अपघाताची घटना समोर येत आहे. पवनी तालुक्यातील सोनेगाव स्मशानभूमीजवळ आज (दि.१२) मजुरांना घेऊन जाणारे वाहन उलटल्याची घटना घडली. या वाहनातून 27 मजूर प्रवास करत होते. वाहन अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात 14 मजूर जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. यामधील दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी भंडारा येथील रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमी मजूर हे अड्याळजवळील नेरला येथील आहेत. ते सोनेगाव येथे शेतातील धान कापणीला जात होते. जिल्ह्यात सर्वत्र उन्हाळी धान कापणी जोरात सुरू आहे. शेतकरी ट्रॅक्टर आणि मजुरांच्या सहाय्याने धान कापणी उरकून घेत आहेत. शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने दूरवरून वाहनाने मजूर बोलावून शेतीची कामे उरकून घेत आहेत.
हे 27 मजूर नेरला येथून सोनेगाव येथे जात असताना सोनेगाव स्मशानभूमीजवळ वाहनचालक मालक महेंद्र मुरकुटे (रा.नेरला) याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन एका शेताच्या बांधावर उलटले. यामध्ये वाहनातील 27 मजूर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.