धाड (बुलडाणा) : लग्नासाठी आलेल्या तरुणाचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 11) खोर गावात घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अमर विज्ञान काकडे (21, रा. मेहुणाराजा ता. देऊळगावराजा) असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देऊळगावराजा तालुक्यातील मेहुणाराजा येथील अमर काकडे हा गावातील लग्न असल्यामुळे खोर येथे गेला होता. लग्न आटोपल्यानंतर सर्व वऱ्हाडी गावात आले. परंतु, अमर हा घरी परत न आल्याचे त्याचे वडील विज्ञान काकडे यांच्या लक्षात आले.
त्यानंतर त्यांच्यासह अमरच्या आईने लग्नावरून आलेल्या गावातील लोकांना मुलाविषयी विचारणा केली असता कोणी काहीच सांगितले नाही. त्यामुळे अमरचे वडील खोर येथे गेले असता तेथील लोकांच्या चर्चेवरून एक मुलगा खोर येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता. परंतु, तो यामध्ये बुडाल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर गावातील लोकांसह कार्यकर्त्यांनी पाझर तलावात बुडालेल्या मुलाचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, अमर काकडे याच्या वडिलांनी रायपूर पोलिसांत माहिती दिली. यावरून पोलिसांनी नोंद घेत शवविच्छेदनासाठी मृतदेह बुलडाणा येथे पाठविला.