नागपूर : नागपूर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिस कर्मचाऱ्याच्या मुलाने दिलेल्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी झिरो अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तुषार सुधीर येवले (वय-24, रा. म्हाळगीनगर) असे मृताचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर येवले हे वीज विभागात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी मौजा कामठी येथील भूखंडाची विक्री केली होती. त्यातून त्यांना लाखो रुपये मिळाले होते. ही बाब त्यांचा मुलगा तुषार याचा बालमित्र निशाण (बदललेले नाव) याला माहिती होती. निशाणचे वडील पोलिस विभागात कार्यरत आहेत.
दरम्यान, त्याला कॅफे उघडण्यासाठी पैशांची गरज होती. तुषारच्या वडिलांनी नुकताच भूखंड विकला असून, त्याचे त्यांना लाखो रुपये मिळाले असल्याची बाब निशाणला माहिती होती. त्यामुळे निशाणने तुषारकडे पैशांची मागणी केली. तसेच घेतलेले पैसे लवकरच परत करण्याचे आश्वासन देखील दिले. सुरक्षा म्हणून कोरा धनादेशही दिला. निशाण हा बालपणापासूनचा मित्र असल्याने तुषारने वडिलांना काही माहिती न देता मित्राच्या खात्यात 11.70 लाख रुपये वळवले.
काही दिवसामध्येच त्याचा कॅफे बंद झाला आणि निशाण मुंबईला निघून गेला. या दरम्यान तुषारने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. त्याने कॅफे विकून पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र, बरेच दिवस होऊनही त्याने पैसे परत केले नाही. तुषारने जेव्हाही त्याला फोन केले तेव्हा निशाण टाळाटाळ करत होता. काही दिवसानंतर त्याने तुषारचे फोन उचलणेही बंद केले.
त्यामुळे तणावात असलेल्या तुषारने विष प्राशन केले. उपचारादरम्यान, तुषारचा शनिवारी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.