नागपूर : नागपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आईच्या डोळ्यासमोर तिच्या काळजाचा तुकडा नेहमीसाठी हिरावला गेला आहे. लहान मुलाला सोबत घेऊन सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या आईच्या डोळ्यादेखत अज्ञात चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विवान रुपेश आमदरे (वय-४, आदर्शनगर, दिघोरी) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
नेमकं काय घडल?
आई करिष्मा (वय-३२) या विवानला घेऊन दुचाकीने गांधीबागेत सामान खरेदीसाठी गेल्या होत्या. तेथून परत येताना एलओसी चौकातील सिमेंट मार्गावर वेगाने आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने करिष्मा यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये करिष्मा व विवान दोघेही खाली पडले. चारचाकी चालक अपघातस्थळावरून वाहनासह फरार झाला.
घटनास्थळावरील लोकांनी गंभीर जखमी झालेल्या विवानला एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने त्याच्या आईवडिलांना मोठा धक्का बसला आहे. विवानचे वडिल रुपेश यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.