बुलढाणा : इंदोर – अकोला मार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्यानं हा अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले असून सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरवरुन अकोल्याच्या दिशेने रॉयल ट्रॅव्हल्सची ही बस निघाली होती. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात दरीत कोसळली. जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झालं.
मध्यप्रदेश पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. पाहणी करताच २८ रुग्ण जखमी असल्याचं आढळून आलं. या सर्व जखमींना दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं असून जखमी प्रवाशांवर रुग्णांवर उपचार सुरु आहेत.