वर्धा : नाल्यावरील पूल अचानक खचल्यामुळे आजोबा आणि नातं वाहून गेल्याची दुर्दैवी घटना वर्ध्या जिल्ह्यामध्ये घडल्याचे समोर आले आहे. हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील ही घटना असून याबाबत आमदार कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे. सध्या दोघांचाही शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणघाट तालुक्याच्या चानकी येथील नाल्यावरील पूल अचानक खचल्याने आजोबा आणि नातं वाहून गेल्याची घटना घडली आहे. कानगाव येथून बाजार करून परत चानकीला येत असताना ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हाधिकारी व प्रशासनाला याची माहिती देत तात्काळ बचाव पथक घटनास्थळी रवाना करण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या सुचनेनुसार जिल्हा प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचाही शोध सुरू आहे. लाला सुखदेव सुरपाम (वय 55 वर्ष ) व नायरा साठोणे (वय 9 वर्ष ) असं वाहून गेलेल्यांची नाव आहेत. सध्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी व महसूल विभागाचे कर्मचारी वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेत असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शनिवारी संध्याकाळपासुन जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी, नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चानकी येथील नालाही दुभडी भरून वाहू लागाला. या नाल्यावरील पूल यापूर्वीसुद्धा अतिवृष्टीने खचलेला होता मात्र त्याची डागडुजी करण्यात आली होती. परंतु आज आलेल्या पावसाने तो पुन्हा खचला आणि त्यात आजोबा आणि नातं वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.