अकोला : अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटणापूर येथे एका तरूणाने दारूच्या नशेत वडिलांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोटच्या मुलाने रागाच्या भरात आजारी वडिलांना आग लावल्याची घटना घडली आहे. या घटनेत वडिलांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. अजाबराव बापूसा इंगळे (वय- 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा आकाश अजाबराव इंगळे (वय- 30 याच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजाबराव इंगळे हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून लोटणापूर गावात भाड्याच्या खोलीत राहत होते. मागील काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यामुळे ते गंभीर आजारी होते. त्यांच्यावर अर्धांगवायूच्या आजारावर उपचार सुरू होते. त्या आजारपणामुळे ते हालचाल करू शकत नव्हते, म्हणून ते घरात खाटेवरच पडून राहायचे. 14 जुलै रोजी दुपारी त्यांचा मुलगा आकाश हा घरात दारू पिऊन आला आणि त्याने खाटेवर आजारी असलेल्या वडिलांशी भांडण सुरु केले.
दरम्यान, दोघांमधील भांडण टोकाला गेले. आकाशने रागाच्या भरात पेटलेल्या चुलीतील लाकूड घेऊन आजारी वडिलांच्या खाटेला आग लावली. वडिलांना त्या आगीच्या झळांमध्ये सोडून देत तो घराबाहेर गेला. खाटेवरील बिछान्यामुळे आग पेट धरत जास्त भडकली. आजारपणामुळे त्यांना हालचाल करता येत नव्हती. त्यामध्ये मदतीसाठी घरात कुणी नसल्याने आगीच्या भडाक्यात सापडले. या आगीमध्ये ते गंभीर भाजले आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.