गोंदिया : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची काल रात्री तीन जणांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. झिशान सिद्दिकी यांच्या वांद्र्यातील कार्यालयासमोर बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेनंतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेले दिसून आले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं जात आहे. आता यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. “शरद पवारांना केवळ सत्ता हवी. इतकी गंभीर घटना झाल्यावरही त्यांच्या नजरेसमोर खुर्ची आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. “गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे”, असे शरद पवार म्हटले होते. यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवारांना केवळ सत्ता हवी..
“शरद पवारांना केवळ सत्ता हवी. इतकी गंभीर घटना झाल्यावरही त्यांच्या नजरेसमोर खुर्ची आहे. आमच्यासमोर महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा विकास आहे. महाराष्ट्राची जनता आहे. त्यांना खुर्चीवर बोलायचं ते बोलावं”, अशा कणखर शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली.
माझी स्वत:ची बाबा सिद्दीकीशी मैत्री..
“माझी स्वत:ची बाबा सिद्दीकीशी मैत्री होती. आम्ही सोबत काम केलं. दोन आरोपी पकडले असून चौकशी सुरु आहे. काही धागेदोरे मिळत आहेत. काही अँगलही मिळत आहेत. त्यावर बोलणं योग्य नाही. कस्टडी झाल्यावर जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती पोलीस देतील. काही थिअरीज मांडल्या जात आहे. तशा बातम्या येत आहेत. आम्हाला काही माहिती मिळाली असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. मूळ चौकशीवर परिणाम होणार नाही, तेवढीच माहिती पोलीस देतील”, असेही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.