नागपुर : नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी आली. यामुळे मध्य प्रदेशातील जबलपूर येथून हैदराबादला जाणाऱ्या विमानाचे नागपूर विमानतळावर आप्तकालीन लँडींग करण्यात आले आहे. इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. विमान नागपूरला उतरवल्यानंतर कठोर तपासणी करण्यात आली. त्यात काहीच आढळून आले नसून आता धमकी देणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.
अखेर विमान नागपुरात उतरवले..
जबलपूर येथून हैदराबाद येथे जाणारी फ्लॉइट 6E 7308 मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी रविवारी मिळाली. त्यानंतर हैदराबादकडे निघालेले हे विमान नागपूर विमानतळकडे डायवर्ट करण्यात आले. नागपूर विमानतळावर विमानाचे आप्तकालीन लँडींग करण्यात आले. त्यानंतर सर्व प्रवाशांना खाली उतरवण्यात येऊन विमानाची तपासणी करण्यात आली.
धमकी एका कागदाच्या तुकड्यावर..
पोलीस अधिकाऱ्याने दिलेली माहिती अशी की सांगितले की, बॉम्बची धमकी एका कागदाच्या तुकड्यावर मिळाली. हा कागद विमानाच्या बाथरुममध्ये मिळाला. त्यामुळे विमान नागपूरला उतरवून सुरक्षा एजन्सीने कठोर तपासणी केली. त्यात काहीच आक्षेपार्ह मिळाले नाही. त्यानंतर दुपारी दोन वाजता विमान हैदराबादकडे रवाना करण्यात आले.
यापूर्वी देण्यात आली होती धमकी ..
22 ऑगस्ट रोजी मुंबईवरुन येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान उतरवून तपासणी करण्यात आली होती. परंतु त्यात काहीच मिळाले नव्हते. त्यावेळीही विमानाच्या शौचालयामध्ये एक टिशू पेपरवर बॉम्बची धमकी मिळाली होती.