अकोला : गेल्या पाच वर्षांपासून विभक्त राहत असलेल्या एकाने त्याची पत्नी लक्ष्मी म्हात्रे (वय 30) आणि 9 वर्षांची मुलगी माहीवर कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केली. या दोघी झोपेत असताना आरोपीने हे कृत्य केले. ही घटना अकोल्यातील संतोषी माता मंदिराजवळील हनुमान वस्तीत घडली.
मनीष म्हात्रे असे या आरोपीचे नाव आहे. गेल्या काही वर्षांपासून विभक्त असून, ते दोघे नांदेडला राहतात. म्हात्रे परिवारातील गुरुवारी (दि. 25) एका लग्नासाठी दोघी मायलेकी अकोल्यात आल्या होत्या. विभक्त राहत असलेल्या पती-पत्नीमध्ये वाद होते. याच रागातून आरोपीने कुऱ्हाडीने वार करून दोघींची झोपेतच हत्या केली. नंतर मनीष म्हात्रेने स्वतःहून रामदासपेठ पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
दरम्यान, या दोघांमध्ये वाद कशामुळे झाला, हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दुहेरी हत्याकांडप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.