अकोला : अकोला जिल्ह्यातील दाळंबी शेतशिवरात एका 78 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार केल्याची घटना घटना घडली होती. या वृद्ध महिलेवर नातवंडाच्या वयातील युवकाकडून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर काही दिवसांत अत्याचार करणाऱ्या युवकाला बुलडाणा जिल्ह्यातून पोलिसांनी अटक केली आहे. राहुल अर्जुन मोरे (वय-24, राहणार. शिलोडी, बुलडाणा) असं या आरोपीचं नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी राहुल हा तूप विकायचा व्यवसाय करायचा. तो तूप विक्रीसाठी अकोला जिल्ह्यात आला होता. दरम्यान, 78 वर्षीय वृद्ध महिला दुपारच्या सुमारास दाळंबी गावाला जाण्यासाठी पायी निघाली होती. त्यावेळी त्या ठिकाणी 3 जण मोटरसायकलने आले.
त्यातील एका २४ वर्षीय तरुणाने या वृद्ध महिलेला घरी सोडवतो असे सांगून तिला शेत शिवारात घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला होता. भरदिवसा घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान, गावातीलच दोन लोक रस्त्यावरून जात असताना वृद्ध महिलेने आरडाओरड करताच व्यक्तीने घटनास्थळावरुन पळ काढला.
या घटनेनंतर महिलेने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला. अखेर आज दुपारच्या सुमारास आरोपी मोरे याला बोरगाव मंजू पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या शिलोडी गावातून अटक केली आहे.