यवतमाळ : यवतमाळ येथे एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे 13 वर्षांची लेक दगावली असल्याचा आरोप करत आई-वडीलांनी टाहो फोडला आहे. एकुलती एक लेक एका चुकीच्या ऑपरेशनमुळे गमावली, म्हणून आईच्या आश्रूंचा बांध फुटला आणि आई वडिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, 13 वर्षांच्या मुलीला मानेवर गाठ आली. या गाठीमुळे तिची प्रकृती खालवली होती. तिच्या पालकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टर शैलेंद्र यादव यांनी मुलीवर उपचार सुरु केले. मानेवरची गाठ काढण्यासाठी डॉक्टरांनी पालकांना ऑपरेशनचा सल्ला दिला होता. त्यानुसार ऑपरेशनही झालं होतं. उपचार सुरु असलेल्या लेकीला डॉक्टरांनी आम्हाला भेटू दिल नाही. तसेच तिची विचारपूसही आम्हाला करता आली नाही. अस म्हणत मृत मुलीच्या आईने टाहो फोडला.
लेक गमावली.. पण, आम्हाला न्याय द्या
एकुलती एक लेक एका चुकीच्या ऑपरेशनमुळे गमावली, म्हणून आईच्या आश्रूंचा बांध फुटला आणि आई वडिलांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. लेक गमावली.. पण, आम्हाला न्याय द्या.. चुकीचा उपचार केलेल्या डॉक्टरांवर तातडीने कारवाई करा, अशी मागणी आता मृत मुलीच्या आई वडिलांनी केली आहे. मात्र, या प्रकरणाची दुसरी बाजू अद्याप समोर आलेली नसून रुग्णालय प्रशासनाकडून याबाबत अद्याप मौन बाळगण्यात आलं आहे. त्यामळे खरचं चुकीच्या उपचारांमुळे त्या मुलीचा जीव गेला आहे का? की तिची प्रकृती खरचं गंभीर होती? याचा उलगडा अद्याप झाला नाही.