अमरावती : अमरावती जिल्ह्यातील भिवापूर धरणात पोहण्यासाठी गेलेल्या एका २८ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. अक्षय नसकरी (वय-२८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हा आपल्या दोन मित्रासोबत भिवापूर धरणावर फिरायला गेला होता. त्यावेळी पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे अक्षय आणि त्याचे इतर दोन मित्र पाण्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. यातील दोघे कसेबसे पाण्याबाहेर आले. मात्र अक्षय हा खोल पाण्यात बुडाला. त्याचा जीव वाचवण्यासाठी मित्रांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. जवळ कुणीही नसल्याने अक्षयचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सुरेंद्र रामेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शोधपथक घटनास्थळी पोहचले. यावेळी रेस्क्यू टीमनी बचावकार्य सुरु केले. दरम्यान, सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अक्षयचा मृतदेह सापडला. अक्षयचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.