अकोला : केंद्रीय लोकसेवा आयोगात निवड झालेल्या आयएएस पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रावरुन देशभर वादंग उठले आहे. त्यानंतर आता राज्यातील एमपीएससीच्या पदभरतीतही असाच प्रकार झाल्याची शक्यता आहे. ‘यूपीएससी’ नंतर आता ‘एमपीएससी’मध्ये देखील दिव्यांग कोट्यात खोटी प्रमाणपत्रे सादर करण्यात आल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे नऊ जण हे असे प्रमाणपत्र दाखवून अधिकारी झाले आहेत, ते आता रडारवर आहेत. या नऊ जणांची आजपासून (दि. 29) पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचणी होण्याची शक्यता आहे, व्यक्त केली जात आहे.
2022 मध्ये एमपीएससीच्या परीक्षेतील दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या 10 पैकी नऊ उमेदवारांची प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात आली आहेत. या सर्व उमेदवारांची पुन्हा नव्याने शारीरिक तपासणी करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने एमपीएससीला दिले आहेत. या सर्व उमेदवारांची सोमवारपासून पुढचे दोन दिवस नव्याने शारीरिक चाचण्या होण्याची शक्यता आहे. एकूण 623 पदांसाठी परीक्षा घेण्यात आली होती. एकूण जागांपैकी 10 जागा या दिव्यांगांसाठी राखीव होत्या.
दिव्यांग कोट्यातून उपजिल्हाधिकारी पदावर निवड झालेल्या बुलढाणा येथील एका उमेदवाराचे दिव्यांग प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे. दिव्यांग कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवाराने सुरुवातीला खेळाडू, त्यानंतर अंध आणि इतर कोट्यांचा फायदा घेतला होता. त्यामुळे त्यांच्या निवडीवर आक्षेप घेत, त्यांची तक्रार एमपीएससीचे अध्यक्ष रजनीश शेठ यांच्याकडे करण्यात आली आहे.