नागपूर : ताम्हिणी घाटातील बस दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विधानसभेत केली आहे. पुणे येथून महाडकडे जाणाऱ्या बसला ताम्हिणी घाटात अपघात झाला. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यावेळी म्हणाले.
ताम्हिणी घाटाजवळ एका धोकादायक वळणावर बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 पुरुष व 3 महिला अशा एकूण 5 जणांचा मृत्यू झाला असून 27 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर माणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुण्यातील चाकण येथून महाडला लग्नासाठी जात असताना आज (दि. 20) सकाळच्या सुमारास ताम्हिणी घाटातील वॉटरफॉल पॉईंटजवळ अपघात झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रॅव्हल्समध्ये अडकलेल्या अनेकांना बाहेर काढण्यात आलं आहे. संगिता धनंजय जाधव, गौरव अशोक दराडे, शिल्पा प्रदिप पवार, वंदना जाधव आणि एक अनोळखी पुरुष अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, अशी माहिती रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी दिली.