यवतमाळ : यवतमाळमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात घडली आहे. आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आर्यन हा वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते. ३ फेब्रुवारीला शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला होता.
त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा पाईप आणला. आर्यन आणि त्याचे मित्र या पाईपवर चढून खेळू लागले. दरम्यान, खेळता-खेळता काही मुलांनी सिमेंटचा पाईप ढकलला. त्यामुळे आर्यन धाडकन जमिनीवर कोसळला. काही क्षणातच त्याच्या अंगावरुन सिमेंटचा पाईप गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आर्यनचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस तपास करत आहे.