चंद्रपूर : चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात ऐन गणेशोत्सवात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शेतात पडलेल्या वीजवाहक तारांचा स्पर्श झाल्याने 4 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (बुधवारी) सकाळी ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपूर (मेंडकी) गावात घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुंडलिक मानकर, प्रकाश राऊत, युवराज डोंगरे व नानाजी राऊत अशी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गणेशपूर (मेंडकी) येथील हे सर्व शेतकरी बुधवारी सकाळी एका शेतात काम करत होते. काम करताना सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांचा स्पर्श वीजवाहक तारांना झाला. विजेचा प्रवाह सुरु होता त्यामुळे या दुर्घटनेत चार शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर 2 शेतकरी गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, ही घटना रानडुक्करांच्या बंदोबस्तासाठी शेतीच्या कुंपणात सोडलेल्या वीजवाहक तारांमुळे घडली आहे का? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र पोलिस त्या दृष्टीकोनातून चौकशी करत आहेत. दोन दिवसांपूर्वी या भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे विद्युत वाहक तारा शेतात पडल्या होत्या. त्या तशाच राहिल्यामुळे ही दुर्घटना घडली असा दावाही या प्रकरणी केला जात आहे. वीज केंद्राचे अधिकारी, पोलिस प्रशासनाकडून या घटनेचा तपास सुरु आहे.