नागपूर : नागपूर जिल्ह्यातील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी दुपारी गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीसलाईन टाकळी येथे घडली आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपाळ विष्णू गोळे असं ३५ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे. ते मूळचे बाळापूर, अकोला येथील रहिवासी होते. सुमारे दीड वर्षे ते यशोधरा पोलीस ठाण्यात तैनात होते. पोलीस लाईनच्या क्वॉर्टरमध्ये ते राहत होते. त्यांचे आई-वडील अकोल्यात राहतात. ते पत्नी आणि सहा महिन्यांच्या मुलीसोबत नागपूर येथे राहत होते.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, वर्षभरापूर्वी त्यांच्या भावाचा अपघातात मृत्यू झाल्याने गोळे हे तणावात होते. त्यांना दारूचे व्यसनही जडले होते. त्यामुळे त्यांचा पत्नीशीही सतत वाद होत होता. या रागातून पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी गेली होती. यानंतर गोळे क्वार्टरमध्ये एकटेच राहत होते. १३ जानेवारीपासून गोपाल गोळे ड्युटीवरही जात नव्हते. यशोधरानगरचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर नेडोडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संपर्क साधला असता त्यांनी एक-दोन दिवसात येण्याचे आश्वासन दिले.
मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे यांच्या कुटुंबियांना याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन चौकशी केली. त्यावेळी ते पोलीस स्टेशनलाही आले नसल्याची माहिती मिळाली. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी गोळे यांनी गळफास लावलेले दिसले. पोलिसांनी तात्काळ त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.