चंद्रपूर : शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुख यांच्या हत्येप्रकरणी ठाकरे गटातीलच अन्य ३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. दरम्यान, पोलीस या तीन जणांची कसून चौकशी करत आहेत. शिवा वझरकर असं हत्या झालेल्या ठाकरे गटाच्या युवा सेना शहर प्रमुखाच नाव आहे. शिवा वझरकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. अरविंदनगर भागातील स्वप्नील काशीकर नामक मित्राच्या कार्यालयापाशी त्यांचा मृतदेह आढळून आला होता.
दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृतक आणि ३ आरोपी यांच्यात काही दिवसापांसून वैयक्तिक कारणावरून भांडणं सुरू होती. याच भांडणाचा राग मनात धरून शिवा यांना भेटण्यास बोलावून घेतले आणि त्यांची हत्या करण्यात आली आहे.
या घटनेनंतर शिवा यांच्या समर्थकांनी या भागात उभ्या असलेल्या जेसीबींची तोडफोड करून संताप व्यक्त केला होता. खून केल्यानंतर तिन्हीही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी सापळा रचून स्वप्नील काशीकर, हिमांशू कुमरे आणि चैतन्य आसकर या ३ कार्यकर्त्यांना काल रात्री अटक केली आहे. रामनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.