अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 258 प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आले आहेत. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांचे तडजोड मुल्य रुपये 13 लाख 83 हजार 831 रुपये व प्रलंबित प्रकरणाचे तडजोड मुल्य 6 लाख 81 हजार 901 रुपये असे एकूण 20 लाख 65 हजार 732 रुपये तडजोड मुल्य रुपये वसुल करण्यात आले.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रकरणे आपसी तडजोडीने मिटविण्यासाठी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश, न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी तथा घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष अतुल अरुण उत्पात, सह दिवाणी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांचेसह घाटंजी तालुक्यातील वकील मंडळी यांनी अथक परिश्रम घेतले.
राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष एन. व्ही. न्हावकर, यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव के. ए. नहार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवार (दि. 28) घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ‘राष्ट्रीय लोक अदालत’ आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रीय लोक अदालतीची सुरुवात घाटंजी न्यायालयातील ज्येष्ठ पक्षकार यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन व रोपांना पाणी देऊन करण्यात आले.
या वेळी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश, घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष व न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी सर्व उपस्थित पक्षकारांना राष्ट्रीय लोक अदालतीचे महत्व पटवून जास्तीत जास्त पक्षकारांनी राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील राष्ट्रीय लोक अदालतीत घाटंजी शहर व तालुक्यातील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता घाटंजी न्यायालयातील कर्मचारी वृंद, पोलिस ठाणे घाटंजी, पोलिस ठाणे पारवा येथील ठाणेदार, पोलिस अधिकारी व कर्मचारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती घाटंजी अंतर्गत कर्मचारी, विविध बँका तसेच पतसंस्थेचे अधिकारी व कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.
14 डिसेंबर 2024 रोजी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात होणा-या राष्ट्रीय लोक अदालतीत जास्तीत जास्त पक्षकारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन घाटंजी विधी सेवा समितीचे अध्यक्ष, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 1 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अतुल अरुण उत्पात यांनी केले आहे.